वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी ‘फॉरेन्सिक मेडिसिन’ कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक, शास्त्रोक्त आणि गतीने व्हावा, तसेच न्यायालयामध्ये गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सबळ पुरावे गोळा करता यावेत, या उद्देशाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलचे फॉरेन्सिक मेडिसिन तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना महत्वपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेदरम्यान डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी फॉरेन्सिक मेडिसिनच्या (न्यायवैद्यक शास्त्र) माध्यमातून गुन्ह्यांची उकल कशी करावी, याबाबत स्लाईड शो आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रामुख्याने खालील विषयांवर प्रकाश टाकला POCSO (पोक्सो) अंतर्गत गुन्हेः बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) दाखल गुन्ह्यांमध्ये वैद्यकीय पुरावे किती महत्त्वाचे असतात, पीडितांची वैद्यकीय तपासणी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कायद्यातील तरतुदींनुसार पुराव्यांचे संकलन कसे करावे, याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. गंभीर आणि प्राणघातक जखमा (Severe Injuries): घटनेच्या वेळी वापरण्यात आलेले हत्यार, जखमेचे स्वरूप (Deep Injuries) आणि त्यावरून गुन्ह्याची भीषणता कशी सिद्ध करावी, याबाबत त्यांनी तांत्रिक मुद्दे समजावून सांगितले. भाजलेल्या जखमा (Burn Injuries) भाजल्यामुळे झालेल्या मृत्यूच्या किंवा गंभीर जखमांच्या प्रकरणांमध्ये घातपात की अपघात, हे फॉरेन्सिक तपासणीद्वारे कसे ओळखावे आणि मृत्यूपूर्व जबाब (Dying Declaration) नोंदवताना घ्यावयाची काळजी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उत्तरार्धात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दैनंदिन तपासादरम्यान फॉरेन्सिक पुराव्यांबाबत येणाऱ्या अडचणी व तांत्रिक अडचणींविषयी डॉ. खांडेकर यांच्याशी थेट संवाद साधला. डॉ. खांडेकर यांनी उपस्थित सर्व प्रश्नांचे व शंकांचे शास्त्रोक्त निरसन केले. फॉरेन्सिक मेडिसिनच्या प्रभावी वापरामुळे तपासाचा दर्जा उंचावून गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (Conviction Rate) वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या मार्गदर्शनाचा थेट फायदा दैनंदिन गुन्हे तपासात होणार असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, तपास अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.



