ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेंदूपत्ता संकलनात “ठेकेदार मालामाल_मजूर दारोदार”

शेकड्यामागे घेतात अतिरिक्त "पस्तुर" ५ पुडे,वन विभागाचे दुर्लक्ष 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यात सध्या तेंदुपत्ता संकलन हंगाम जोरात सुरू असून जंगल परिसरातील हजारो मजूर जीव धोक्यात घालून तेंदुपत्ता गोळा करत आहेत. मात्र एका बाजूला वाघ बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांचा धोका आणि दुसऱ्या बाजूला ठेकेदाराकडून होत असलेली आर्थिक पिळवणूक यामुळे मजुरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ‘पस्तूर’ नावाखाली १०० पुडयामागे ५ पुडया अतिरिक्त घेतल्या जात असल्याने मजुराचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.

 कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत करंजी, तोहोगाव, आक्सापूर परिसरातील तेदूपत्ता युनिटचे लिलाव पार पडले असून तालुक्यातील जवळपास २५ ते ३० गावांमध्ये पानफळी उभारण्यात आले आहेत. या पानफळीवरच मजुरांची आर्थिक लूट सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

 पहाटे चार वाजता पासून महिला पुरुष आणि युवक जंगलात जाऊन दिवसभर कडक उन्हात तेदूपत्ता संकलनाचे काम करतात. दाट जंगल, वन्य प्राण्यांचा वावर आणि जीविताचा धोका पत्करून मेहनत करणाऱ्या मजुरांना योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

स्थानिक मजुरांच्या म्हणण्यानुसार, मोजणीच्या वेळी १००पुडया मागे ५ ‘पस्तूर ‘म्हणून अतिरिक्त पुडे घेतल्या जातात. त्यामुळे प्रत्यक्षात मजुरांच्या मेहनतीच्या मोबदल्यात कपात होत आहे. दिवसभर जंगलात जीव धोक्यात घालून काम करायचे आणि शेवटी मोजणी वेळी ५ पुड्या कमी केल्या जातात. मेहनत आमची आणि फायदा ठेकेदाराचा अशी सतप्त प्रतिक्रिया काही मजुरांनी व्यक्त केली. अनेक गरीब आणि आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह तंदुपत्ता हंगामा वर अवलंबून असताना अशा लूटमारीच्या प्रकारामुळे त्यांच्या हातात येणारी रक्कम घटत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील जवळपास पंधरा ते वीस गावातील पानफळीवर हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ठिकाणी मजूरानी पानफळीवरच संताप व्यक्त करीत संबंधित विभागाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र वन विभागाकडून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून वनविभाग व ठेकेदार यांच्यात मिलिभगत असल्याची भावना मजुरांमध्ये व्यक्त होत आहे.

तेंदूपत्ता संकलन प्रक्रियेत पारदर्शकता आणावी,’ पस्तूर’ च्या नावाखाली अतिरिक्त पुड्या घेण्याची पद्धत तातडीने बंद करावी,तसेच संबंधित ठेकेदाराची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वनविभाग आणि प्रशासनाने पानफळीवर प्रत्यक्षात पाहणी करून मजुराची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी सर्व सामन्यातून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये