ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक ; आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तिनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. तिनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आयेाजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.

सदर निवडणुकीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर‍ परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरेाली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या शुन्य आहे.

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर वसुमना पंत यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये