मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची हंसराज अहीर यांनी घेतली भेट
पं. बंगाल मधील ओबीसी आरक्षण अन्यायाबाबत सखोल चर्चा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी यांची पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पूर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांनी नुकतीच कलकत्ता येथे प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी हंसराज अहीर यांनी पश्चिम बंगालमधील ओबीसी आरक्षण व सरकारी भरती प्रक्रियेबाबत गंभीर मुद्दे मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असतांना त्यांनी तत्कालीन ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील आरक्षण घोटाळ्याची सविस्तर माहिती दिली.
अहीर यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सांगितले की, शिक्षक, पोलिस तसेच अन्य सरकारी विभागातील भरती प्रक्रियेत ओबीसी आरक्षणामध्ये मुस्लिम जातींचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला होता. विशेषतः सन 2011 ते 2022 या कालावधीत शिक्षक, पोलिस व अन्य भरतीमध्ये ओबीसी कोट्यात अवैध मार्गाने मुस्लिम उमेदवाराचा समावेश केल्याची सआधार माहिती या भेटी प्रसंगी अहीर यांनी दिली.
या संदर्भात त्यांनी आयोगाच्या पाहणीत आलेल्या काही भरती याद्यांचाही उल्लेख केला. शिक्षक, पोलीस व अन्य भरतीमध्ये झालेला घोळ व ओबीसी आरक्षणाची लुट झाल्याचे निदर्शनास आणून देत या सर्व बाबींशी संबंधित पुरावे मुख्यमंत्री अधिकारी यांना सादर करण्यात आल्याचेही अहीर यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल अभ्यासाअंती चौकशी करून अवैध नोकर भरतीत मुळ ओबीसींना न्याय देण्याची गरज असल्याने आपण याची गंभीरपणे दखल घ्यावी अशी चर्चेतून मागणी व अपेक्षा अहीर यांनी व्यक्त केली.



