भिवगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : तालुक्यातील भिवगाव शिवारातील गौराई मंदिराजवळ सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर देऊळगाव राजा पोलिसांनी छापा टाकत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायम गुन्हा क्रमांक १९९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक ब्रम्हा संताराम गिरी (पोलीस स्टेशन देऊळगाव राजा) यांनी सरतर्फे फिर्याद दिली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजताच्या सुमारास ग्राम भिवगाव शेतशिवारातील गौराई मंदिराजवळ पंचासमक्ष जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी कथितरित्या ‘एक्का बादशाह’ नावाचा जुगार खेळताना आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत आरोपींकडून अंगझडतीदरम्यान ६,०८० रुपये रोख रक्कम, डावावर असलेली १,५५० रुपयांची रोकड तसेच ५२ पत्त्यांचे चार संच, असा एकूण ७,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हमीद महेमुद शेख (रा. कबाडपुरा, देऊळगाव राजा), रमेश गोपीचंद राठोड (रा. बाजीउमरद, जि. जालना), अरुण दामोदर साळवे (रा. मलकापूर पांगरा, ता. सिंदखेड राजा), संतोष बाबुराव कायंदे (रा. झोटिंगा), किसन आबाराव सवडे (रा. अकोला देव, ता. जाफराबाद), परवेज खान गफार खान कोटकर (रा. हकीम कॉलनी, देऊळगाव राजा), नामदेव झाबू राठोड, शेख जावेद शेख निजामुद्दीन, कैलास अविचराव कवलिंगे आणि नामदेव श्रीराम डिघोळे यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईनंतर पुढील तपास पोहेकॉ गोरे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोहेकॉ साळवे यांनी केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.



