रेतीमाफीयांविरुध्द पोलीस, महसूल विभागाची धडक कारवाई
८१ लाखांचा एवज जप्त ; संत चोखामेळा धरणात अवैध उपशासाठी वापरलेली बोट पकडली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील ग्राम सिनगाव जहागीर शिवारातील संतचोखामेळा धरण परिसरात बोटींद्वारे सुरू असलेल्या कथित अवैध रेती उपशावर देऊळगाव राजा पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने धडक कारवाई करत तब्बल ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून, इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना गुप्त माहितीदारामार्फत संतचोखामेळा धरण परिसरात बोटींच्या सहाय्याने शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने संयुक्त कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्यासह पोउपनि राजकुमार मोहोळकर, पोहेकॉ रामकिसन गिते, पोलीस कर्मचारी प्रवीण डोईफोडे व शिवाजी दराडे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. संतचोखामेळा धरण परिसरात बोटीद्वारे पेट्रोलिंग करताना जलाशयात काही इसम रेतीचा उपसा करून चोरी करताना आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच काही संशयित इसम दुसऱ्या बोटीतून पसार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र घटनास्थळी असलेल्या तीन मोठ्या लोखंडी बोटी व रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजिनयुक्त तीन लहान बोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या बोटींमध्ये एकूण ९ ब्रास रेती आढळून आली.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून शेख फिटू शेख मुस्ताक (वय ३०, रा. अनामत, ता. राजमहल, जि. साहेबगंज, राज्य झारखंड) यास ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या पंचनाम्यात ३ मोठ्या लोखंडी बोटी, ३ इंजिनयुक्त लहान बोटी, जोडणी साहित्य व ९ ब्रास रेती असा एकूण ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी शेख फिटू शेख मुस्ताक व इतर फरार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम कलम २१(१), २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संयुक्त कारवाई पोलीस विभाग व महसूल विभागाने संतचोखामेळा धरण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केली. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.



