ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जालना बायपासवर अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; दाम्पत्याचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : तालुक्यातील जालना बायपास मार्गावरील श्रावणी लॉन्ससमोर झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जनार्धन सुभाष भोपळे (वय २४, रा. देऊळझरी, ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कायम अपघात क्रमांक २१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादीचे वडील सुभाष आनंदा भोपळे व आई चांगुणाबाई सुभाष भोपळे हे धायडी, जिल्हा जालना येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी मोटरसायकल क्रमांक एमएच २० बीजे ८०८६ ने देऊळगाव राजा मार्गे जात होते.

दरम्यान, श्रावणी लॉन्ससमोर जालना बायपासवर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात चांगुणाबाई भोपळे या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या, तर सुभाष भोपळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ विनोद गवई यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये