येल्लापूरच्या सुषमा चांदेकर (निखाडे) यांची राजपत्रित अधिकारीपदी निवड
‘सहायक नगर रचनाकार’ परीक्षेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून अव्वल; येल्लापुर, कायर गावाचा गौरव
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- “तिने नोकरी करणारी कर्मचारी नव्हे, तर निर्णय घेणारी अधिकारी व्हावं,” हा पती पंचशील निखाडे यांचा विश्वास अखेर खरा ठरला. जिवती तालुक्यातील येल्लापुर येथील मूळ रहिवासी तथा सध्या कायर ता. वणी येथे वास्तव्यास असलेल्या सुषमा मारोती चांदेकर (निखाडे) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘सहायक नगर रचनाकार’ (वर्ग-१ राजपत्रित अधिकारी) परीक्षेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सुषमा यांनी बी.टेक (सिव्हिल)चे शिक्षण घेत असतानाच विवाह केला. संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी विदर्भात फारसे परिचित नसलेल्या ‘टाऊन प्लॅनिंग’ क्षेत्राची निवड केली. पुण्यात राहून कोणत्याही मोठ्या क्लासेस किंवा विशेष मार्गदर्शनाशिवाय MRTP Act, DP प्लॅन, FSI यांसारखे क्लिष्ट विषय स्वबळावर अभ्यासले. सलग तीन वर्षे पहाटे ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवले. या यशामागे पती पंचशील निखाडे यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व कुटुंबीयांची साथ महत्त्वाची ठरली. “तू अधिकारीच व्हायला हवं,” हा पतीचा आत्मविश्वासच आपल्यासाठी प्रेरणा ठरल्याची भावना सुषमा यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, निखाडे कुटुंबासाठी हा महिना दुहेरी आनंद घेऊन आला आहे. सुषमा यांचे दीर प्रशांत (बुद्धिवान) बिंबिसार निखाडे यांची नुकतीच पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावर निवड झाली असून, आता सुषमा यांचीही राजपत्रित अधिकारीपदी निवड झाल्याने येल्लापुर व कायर गावात आनंदाचे वातावरण आहे. “या पदाच्या माध्यमातून शहरांच्या नियोजन प्रक्रियेत प्रभावी योगदान देण्याची संधी मिळणार आहे,” असे सुषमा मारोती चांदेकर (निखाडे) यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल मंगळवार, १९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता बुद्ध विहार, कविटपेठ ता. राजुरा येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला DySP प्रशांत (बुद्धिवान) निखाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ‘स्टार प्रवाह’ फेम गायिका अंजली गडपाले यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रमही होणार आहे..



