ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी वर्ध्यात ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस दलातील वाढती कामाची व्याप्ती, अनियमित वेळा आणि त्यामुळे येणारा मानसिक ताण लक्षात घेता, काल दिनांक १५ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथील मिटिंग हॉलमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी एका विशेष ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ (Stress Management) मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून सामान्य रुग्णालय वर्धा येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ *डॉ. सुदर्शन हरले, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सोनल हरले आणि त्यांची तज्ञ टीम उपस्थित होती. मार्गदर्शन करताना डॉ. सुदर्शन हरले यांनी सांगितले की, “पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असते. अशा अत्यंत जबाबदारीच्या आणि आव्हानात्मक ड्युटीमुळे पोलिसांवर शारीरिक व मानसिक ताण येणे स्वाभाविक आहे. मात्र, या ताणाचे वेळीच व्यवस्थापन केले नाही, तर त्याचे रूपांतर नैराश्य किंवा विविध आजारांमध्ये होऊ शकते.” त्यांनी पुढे बोलताना ताण-तणाव ओळखण्याची लक्षणे आणि त्यावर मात करण्यासाठी दैनंदिन जीवनात करायचे छोटे-छोटे बदल यावर सविस्तर प्रकाश टाकला.

श्रीमती सोनल हरले आणि त्यांच्या टीमने पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने तणावमुक्त होण्यासाठी काही सोपे मानसिक व्यायाम, ध्यानधारणा (Meditation) आणि सकारात्मक विचारसरणी कशी जोपासावी, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. तसेच, कामाच्या व्यस्ततेतही स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढणे किती गरजेचे आहे, हे पटवून दिले.

या महत्त्वपूर्ण शिबिराला वर्धा पोलीस दलातील ६ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्ह्यातील पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातील वेगवेगळ्या शाखेतील १०० पोलीस अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपल्या शंकांचे डॉ. हरले यांच्याकडून निरसन करून घेतले. पोलीस दलाचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये