चक्रीवादळाने जलशुद्धीकरण केंद्र नेस्तनाबूत
नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा :_ शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार चक्रीवादळामुळे झुंलूरवार तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्णतः नेस्तनाबूत झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
चक्रीवादळाचा फटका संपूर्ण परिसराला बसला असून अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच विद्युत पोल कोसळल्याने वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
जलशुद्धीकरण केंद्राचे मोठे नुकसान झाल्याने गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वादळामुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संबंधित विभागाने त्वरित मदत द्यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.



