युवकाला पिकअपची धडक ; उपचारादरम्यान मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील दरूर-कीरमिरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. गोपाल बंडू आत्राम (वय २५, रा. कीरमिरी) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल आत्राम हा सकाळी बैल विक्रीसाठी दरूर बाजारात घेऊन जात होता. दरम्यान, सकाळी सुमारे ५.०० वाजताच्या सुमारास दरूर-कीरमिरी मार्गावर भरधाव अज्ञात पिकअपने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात गोपाल गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोपाल हा कुटुंबातील कर्ता युवक असल्याने त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.



