गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र सुरू करा
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथे विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र सुरू करण्यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने मागणी केली असून यासंदर्भात संघटनेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र – कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.धनराज पाटील यांना गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोरलावार यांनी निवेदन दिले आहे यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदासजी कामडी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचांदूर परिसरामध्ये विदर्भ महाविद्यालय जिवती, राजीव गांधी महाविद्यालय पाटण, प्रभाकर मामुलकर महाविद्यालय कोरपना, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर आणि महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूरअशी एकूण पाच परीक्षा केंद्र कार्यरत आहेत.सद्यस्थितीमध्ये या सर्व केंद्रावरील उत्तर पत्रिकांचे संकलन चंद्रपूर येथे करण्यात येते. मात्र उपरोक्त महाविद्यालच्या परीक्षा केंद्रापासून चंद्रपूर संकलन केंद्र हे अधिक अंतरावर असल्याने गैरसोयीचे ठरत आहे.या संदर्भात गडचांदूर येथे उत्तरपत्रिका संकलन केंद्र करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील परीक्षा केंद्रावर कार्यरत मुख्य परीक्षा प्रमुखांनी केली आहे.
प्रत्यक्ष परिस्थिती विचारात घेतल्यास वरील सर्व महाविद्यालय व चंद्रपूर यातील अंतर सुमारे 60 ते 95 कि.मी.दरम्यान आहे.विशेषता जिवती येथील परीक्षा केंद्रावर तीन महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा देत असल्यामुळे उत्तरपत्रिकांची संख्या लक्षणीय प्रमाणात असते याशिवाय जिवती ते चंद्रपूर हे अंतर सुमारे 95 किमी असून रस्त्याची दयनीय अवस्था व वेळेवर सार्वजनिक वाहतूक बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे उत्तर पत्रिका मोटर सायकल द्वारे पाहून नेण्याची वेळ येते जे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आहे. तसेच पाटण ,कोरपणा, गडचंदूर येथील केंद्रांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.कोरपणा ते चंद्रपूर अंतर 80 किलोमीटर असून गडचंदूर ते चंद्रपूर हे अंतर 60 किलोमीटर आहे.
वरील बाबी लक्षात घेता एवढ्या लांब अंतरावर उत्तरपत्रिकाचे वाहन करताना वेळ श्रम व सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे याशिवाय चालू वर्षातील तीव्र उन्हाळा, संभाव्य उष्माघाताचा धोका व दीर्घ अंतराचा प्रवास आणि अपघाताची शक्यता या सर्व बाबींचा विचार करून गडचांदूर येथे उत्तर पत्रिका संकलन केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.



