ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रत्येक आदिवासी प्रकल्पात आता उन्हाळी प्रशिक्षण शिबीर – पालकमंत्री डॉ. वुईके

चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या उपक्रमाची दखल व कौतुक

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन होत असते. मात्र अशा शिबिरांची प्रवेश फी, अतिशय जास्त असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यांना पाठवू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणात खर्चही करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. हा अतिशय स्त्युत्य उपक्रम असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून चंद्रपूरचा हा उपक्रम राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रकल्पात राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत बोर्डा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शाळेचे मुख्याध्यापक रामदास खवशी आदी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा, असे सांगून डॉ. वुईके म्हणाले, विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीबद्दल माहिती व्हावी, तसेच ही संस्कृती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावे, या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी शासकीय आश्रमशाळा बोर्डा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात धनुर्विद्या, गोंडी व वारली पेंटिंग, संगीत, विविध वाद्य वाजवणे कला, कराटे, लाठी काठी चालवणे, योगा, क्ले आर्ट व मुलींसाठी मेहंदी कला, बांबू आर्ट आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिराचा आदिवासी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.अशोक वुईके त्यांनी केले.

शिबिरात चंद्रपूर प्रकल्पातील 8 शासकीय आश्रमशाळा व 24 अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य आश्रमशाळेतील सुमारे 150 मुली व 80 मुले अशा एकूण 230 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल पथकाच्या गजरात मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर उन्हाळी प्रशिक्षणामध्ये आलेल्या 230 विद्यार्थ्यांना, एक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात येत येणार आहे. जेव्हा नवीन सत्रात शाळा सुरू होईल, तेव्हा हे प्रशिक्षित झालेले विद्यार्थी आपापल्या शाळेमध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन उच्च माध्यमिक शिक्षिका अनुराधा लाड यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास खवशी यांनी मानले. कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये