राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष : चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र तसेच सरकारी-निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही या संपाला जोरदार प्रतिसाद मिळत असून, भद्रावती तहसील कार्यालय प्रांगणात कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, राज्य शासनाचा कार्यकाळ सुरू होऊन १३ महिने उलटूनही कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागील वर्षभरात धरणे, सत्याग्रह, मोर्चे, साखळी उपोषण अशा विविध लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्य सचिवांनी १५ दिवसांत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ११ डिसेंबर २०२५ रोजी साखळी उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दरम्यान, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना १ मार्च २०२४ पासून लागू झाल्यानंतरही त्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पेन्शन व तात्पुरते निवृत्ती वेतन मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, लिपीक संवर्गातील वेतन त्रुटी दूर करणे, कॅशलेस आरोग्य सुविधा आदी विविध मागण्या प्रलंबित असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, ७ व ८ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची नोटीस १७ मार्च रोजी शासनाला देण्यात आली होती.
या संपादरम्यान कर्मचारी व शिक्षकांनी कार्यालये व शाळांमध्ये हजर न राहता संबंधित ठिकाणी धरणे आंदोलन करून नंतर जाहीर सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व शिक्षकांनी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनात नायब तहसीलदार मधुकर काळे, देवानंद गावंडे, सौ. प्रमोदिनी रामटेके, गोकुळ पंडिले, सार्थक रत्नपारखी, गीता सी., शांताबाई माणूसमारे तसेच अन्य कर्मचारी सक्रिय सहभागी झाले आहेत.



