ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“वर्ल्ड बुक डे” निमित्त आरसीईआरटी चंद्रपूरमध्ये भव्य पुस्तक प्रदर्शन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ वाचन संस्कृतीचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे “वर्ल्ड बुक डे” निमित्त भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम २३ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयाच्या केंद्रीय ग्रंथालयाच्या वाचन कक्षात प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दिलीप धोक यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील संदर्भ ग्रंथ, तांत्रिक व शैक्षणिक पुस्तके, दुर्मिळ व ऐतिहासिक ग्रंथ तसेच नव्याने प्रकाशित झालेली पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांचे अवलोकन केले आणि ज्ञानवृद्धीसाठी आवश्यक साहित्याची माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथपाल डॉ. नूतन पिदूरकर यांनी प्रास्ताविकातून “वर्ल्ड बुक डे” चे महत्त्व अधोरेखित केले. वाचनाची सवय ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक असून, डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांची माहिती मिळाली तसेच वाचनाची गोडी वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय विभाग व आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“All Are Welcome” या संदेशासह विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्याचे व ज्ञानसंपन्न होण्याचे आवाहन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये