पीएच.डी.पदवी करिता आवश्यक असणारी पेट परीक्षा त्वरित घ्या
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचे कडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गोंडवाना विद्यापीठ स्तरावर संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना संशोधन करीत असताना अनेक समस्या येत असून यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचेकडे विविध समस्या सोडवण्याच्या संदर्भात निवेदन दिले आहे.
गोंडवाना विद्यापीठ आचार्य पदवीकरिता पेट परीक्षा घेतली जाते मात्र गेल्या दोन वर्षापासून यासंदर्भात परीक्षा घेण्यात आली नाही. विद्या परिषद,अधिसभा, व व्यवस्थापन परिषद या प्राधिकरण स्तरावर परीक्षा घेण्यासंबंधी मान्यता दिली असताना सुद्धा अजून पावेतो पेट परीक्षा घेण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित झाले नाही या प्रश्नाकडे यंग टीचर्स असोसिएशनने लक्ष घालून ही समस्या कुलगुरूंच्या निदर्शनास आणली आहे. तसेच आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना यूजीसी 11 जुलै 2009 च्या रेगुलेशन नुसार आचार्य पदवी प्रमाणपत्र देण्याबाबत संघटनेने मागणी केली आहे.
तसेच गोंडवाना विद्यापीठातील आचार्य पदवी कक्षात गतिशीलता आणण्यासाठी तसेच या विभागातील कार्यप्रणालीत सक्रियता आणण्याच्या दृष्टीने या विभागात अधिकचे मनुष्यबळ देण्यासंदर्भात संघटनेने कुलगुरूंकडे मागणी केली आहे.आचार्य पदवी कोर्स वर्क मध्ये नापास झालेल्या संशोधक विद्यार्थ्याकरिता गोंडवाना विद्यापीठातील आचार्य पदवी कोर्स वर्क परीक्षा लवकर घेण्यासंदर्भात प्रश्न संघटनेने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले.
लेखी परीक्षा संबंधित मुख्य परीक्षक व सह परीक्षक यांची मानधन देयके त्वरित करण्याच्या संदर्भात निर्णय झाला असताना सुद्धा परीक्षा विभाग वित्त आणि विभागाद्वारे त्यांना अग्रीम दिल्या जात नसल्याच्या संदर्भातील समस्या कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे.
यासंदर्भात कुलगुरू महोदयांनी शिष्टमंडळाच्या विद्यार्थी शिक्षक व विद्यापीठ विकास भूमिकेचे स्वागत करून वरील समस्या तात्काळ सोडण्याचे आश्वासन दिले या शिष्टमंडळात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे ,सचिव डॉ. विवेक गोरलावार, सहसचिव डॉ. सतीश कन्नाके, नूटा जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश दूधपचारे, विभाग समन्वयक डॉ. राजेंद्र गोरे, विभाग समन्वयक डॉ. शरद बेलोरकर आणि इतर पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.



