गोंडपिपरीत महिला अधिकारी ‘लेडी सिंघम’
तर पुरुष अधिकाऱ्यांच्या 'शांतते'मुळे संशयाचे धुके!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यात सध्या महसूल विभागातील महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीतील तफावत चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे महिला अधिकारी अतिशय आक्रमकपणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना, दुसरीकडे पुरुष अधिकारी मात्र शांत का? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
आज चेक पारगाव परिसरात सकाळी पावणे नऊच्या सुमारास मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे यांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर दिसला. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन न थांबवता सुसाट वेगाने पळवले. इतकेच नव्हे तर, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने धावत्या ट्रॅक्टरमधील रेती खाली उपसली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु, महसूल मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे यांनी हार न मानता आपल्या सहकाऱ्यांसह (संदीप बोधनवार आणि गौरव मेश्राम) या ट्रॅक्टरचा थरारक पाठलाग केला आणि अखेर एम.एच.-३४-ए.पी.-०९४९ क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केला. त्यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*महिला अधिकारी “लेडी सिंघम”*
तालुक्यात सातत्याने होणाऱ्या कारवायांमध्ये केवळ महिला अधिकारीच आघाडीवर का दिसतात? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मंडळ अधिकारी “लेडी सिंघम” सुकेसिनी कांबळे ज्या तत्परतेने अवैध धंद्यांवर वचक बसवत आहेत, तशी तत्परता पुरुष अधिकाऱ्यांमध्ये का दिसत नाही.? पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ही ‘शांतता’ म्हणजे अवैध धंदेवाल्यांशी असलेली ‘मिलीभगत’ तर नाही ना.? अशी चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे.
*पुरुष अधिकाऱ्यांची निष्क्रियता..!*
एकीकडे महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीमुळे प्रशासनाचा दरारा वाढत असताना, दुसरीकडे पुरुष अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे विभागाची नाचक्की होत आहे. ‘हप्तेखोरी’ किंवा ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळेच हे अधिकारी गप्प आहेत का, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचे कौतुक होत असताना, कामचुकार पुरुष अधिकाऱ्यांवर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



