“मिशन वात्सल्य” अंतर्गत जिल्ह्यात एकल माता मेळाव्यांचे आयोजन
एकल मातांच्या समस्यांचे होणार निराकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर जिल्ह्यातील एकल मातांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाने पुढाकार घेत थेट मैदानात उतरत मोठा निर्णय घेत महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाभर विशेष ‘एकल माता मेळावे’ आयोजित करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असून, या उपक्रमामुळे हजारो महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
“मिशन वात्सल्य” अंतर्गत जिल्ह्यातील एकल मातांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली असून, त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ३ ते ४ ठिकाणी हे मेळावे भरविण्यात येणार आहेत. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू झाले असून, प्रशासन ‘सेवा तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असल्याचे चित्र आहे. या मेळाव्यात महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, समाजकल्याण, कृषी आदी विभागांचे अधिकारी थेट उपस्थित राहून योजनांची माहिती देणार, अर्ज स्वीकारणार आणि अनेक प्रकरणांवर तत्काळ निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महिलांना वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, वारस हक्क, जमीन नोंदी यांसारख्या महसूल विषयक अडचणींवरही ठिकाणीच मार्गदर्शन व निराकरण केले जाणार आहे. तसेच आर्थिक मदत, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. मेळाव्यात प्राप्त होणाऱ्या अर्ज व तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ माहितीपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष परिणाम देणारा ठरणार आहे.
एकूणच, जिल्हा परिषद चंद्रपूरचा हा उपक्रम एकल मातांसाठी दिलासादायक ठरत असून, त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता “हक्कासाठी भटकंती” थांबून “हक्क आपल्या दारी” येण्याची आशा व्यक्त होत आहे.


