पोंभूर्णा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
सुरक्षा वाऱ्यावर; नगरप्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या अपेक्षेने बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे ठप्प झाली असून, नागरिकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर गेल्याचे चित्र आहे. चार वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेले कॅमेरे व पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आज केवळ शोभेची वस्तू ठरली आहे.
नगरपंचायतीने २०१८-१९ या कालावधीत विशेष योजनेअंतर्गत शहरातील १७ महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल ६६ लाख ३८ हजार २६५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कंत्राटदारामार्फत हे काम पूर्ण करण्यात आले.
शहरात एकूण ५५ कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १८ लाख ५० हजार २८४ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नगरपंचायत कार्यालय व पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. या यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनाला गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठी मदत होत होती.
मात्र नियमित देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे ही संपूर्ण यंत्रणा बंद पडली आहे. सध्या शहरातील एकही कॅमेरा कार्यरत नसल्याची माहिती समोर येत आहे. महागडे व नामांकित कंपनीचे कॅमेरे बसवूनही चार – पाच वर्षातच ते नादुरुस्त झाल्याने या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमही बंद अवस्थेत असून, क्लाउड सिस्टीमच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. नगर पंचायतकडून योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
छत्रपती शिवाजी चौक, म.गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, नगरपंचायत चौक, हनुमान चौक, आदिवासी चौक, तहसील कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन मार्ग तसेच गोंडपिपरी,चंद्रपूर,मुल मार्गावरील मुख्य रत्यासह शहरातील विविध ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले होते.
चोरी,तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली ही यंत्रणा निकृष्ट दर्जाची ठरल्याचे दिसून येत असून, आता तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे पूर्वरत सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.
पोंभूर्ण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प होणे हा जनतेच्या सुरक्षेशी केलेला विश्वासघात आहे. लाखो रुपयांचा अपव्यय करून प्रशासन झोपेत आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करून यंत्रणा सुरू करा.
– आशिष कावटवार, विरोधी पक्षनेता, नगरपंचायत, पोंभुर्णा


