ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलिसांची कारवाई; साखळी चोरी प्रकरण उघड, ११ गुन्हे उकल

४ आरोपी एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कठोर कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. चेन स्नॅचिंग (साखळी चोरी) प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करून तब्बल ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच धोकादायक प्रवृत्तीच्या ४ आरोपींवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाल (मध्य प्रदेश) येथील आरोपींनी वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडवल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करून आरोपींना अटक केली. आरोपींकडून सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

तसेच आरोपींनी चोरी केलेल्या दोन मोबाईल फोन (अंदाजे किंमत ६० हजार रुपये) आणि एक मोटारसायकल (अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये) जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त मुद्देमाल सुमारे ३ लाख ३५ हजार रुपयांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे केवळ ७ दिवसांतच १० चेन स्नॅचिंग व १ मोटारसायकल चोरी असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक क्रियाकलाप कायदा) अंतर्गत ४ आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट आणि वर्धा (शहर) पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली असून संबंधित आरोपींना अमरावती, अकोला आणि भंडारा येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

वर्धा पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये