ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संताप

तहसिलदारांच्या बदलीची मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना होत असलेल्या कथित मानसिक त्रासाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित तहसिलदारांच्या विरोधात कारवाई करून तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. याबाबत दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेच्या निवेदनानुसार, भद्रावती येथील तहसिलदार श्री. राजेश भांडारकर यांच्या कार्यपद्धतीमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती, मानसिक ताण आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांना विनाकारण दमदाटी करणे, सार्वजनिक ठिकाणी अवमानकारक भाषा वापरणे, तसेच योग्य मार्गदर्शन न करता कामांमध्ये दोषारोप करणे, अशा प्रकारांचा वारंवार अनुभव येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये वेळेवर निर्णय घेतला जात नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांचा रोष कर्मचाऱ्यांवर निघत आहे. काही प्रसंगी नागरिकांकडून आत्महत्येच्या धमक्या देण्यासारखे गंभीर प्रकारही घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कार्यालयीन कामकाजावर देखील याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत, कर्मचाऱ्यांचे वारंवार टेबल बदलणे, आवश्यक फाईल्सवर सही न करणे, कामात टाळाटाळ करणे, तसेच शासन नियमांनुसार देय बाबींमध्ये अडथळे निर्माण करणे यासारख्या बाबींकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. पुरवठा विभागातील कामकाज, नेटवर्कसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि प्रशासकीय कामांमध्ये होत असलेली दिरंगाई ही देखील गंभीर समस्या असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

दरम्यान, याच संदर्भात १ एप्रिल २०२६ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सध्याच्या परिस्थितीत संबंधित तहसिलदारांच्या अधिपत्याखाली काम करण्याची इच्छा नसल्याचेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

संघटनेने आपल्या मागण्यांमध्ये संबंधित तहसिलदारांवर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करून तात्काळ बदली करण्यात यावी, तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरणात काम करता येईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना जिल्हा अध्यक्ष शैलेष धात्रक, सरचिटणीस मनोज आकणुरवार, सुनील चांदेवार, राहुल फणसे, सुरेश राठोड, आशीष गुलाने यांच्यासह इतर महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये