ऊर्जानगर परिसरातील प्रदूषणावर लवकरच ठोस व कालबद्ध उपाययोजना : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
पंकजाताईंच्या नावातील ‘प’ हा प्रदूषणमुक्तीचा आणि प्रगतीचे प्रतीक : आ सुधीर मुनगंटीवार

चांदा ब्लास्ट
कोळसा बंकर व रोपवे प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी; नागरिकांना दिलासा देण्याचा निर्धार
चंद्रपूर :_ ऊर्जानगर रहिवासी क्षेत्रात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड तसेच चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा बंकर आणि रोपवेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाची दखल घेत पर्यावरण मंत्री मा. ना. पंकजा मुंडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
ऊर्जानगर परिसरातून उघड्यावरून वाहतूक होणाऱ्या कोळशामुळे मोठ्या प्रमाणावर धूळकण हवेत मिसळत असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे व त्वचारोगांचे गंभीर त्रास निर्माण झाले आहेत. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या समस्येने चिंताजनक स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेद्वारे हा मुद्दा ठळकपणे मांडत तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्या चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता म्हणून आजचा दौरा पार पडला.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“ऊर्जानगर परिसरातील नागरिक आज अत्यंत गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. कोळसा बंकर आणि रोपवेच्या माध्यमातून उघड्यावरून होणारी कोळशाची वाहतूक ही येथील प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून श्वसनाचे आजार, त्वचारोग यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून मानवी आरोग्याशी निगडित अत्यंत संवेदनशील बाब आहे.”
ते पुढे म्हणाले,“मी हा विषय विधानसभेत अर्धा तास चर्चेद्वारे मांडला आणि सरकारचे लक्ष वेधले. पर्यावरण मंत्री पंकजाताईंनी त्यावेळी तात्काळ पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्या स्वतः येथे येऊन परिस्थिती पाहत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पंकजाताईंच्या नावातील ‘प’ हा प्रदूषणमुक्तीचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे. त्यांच्या नेतृत्वात या भागाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस, प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या,परळी येथील औष्णिक वीज केंद्रामुळे होणारे प्रदूषण मी बालपणापासून अनुभवले आहे. त्यामुळे या समस्येची तीव्रता आणि परिणाम मला पूर्णपणे माहिती आहेत. ऊर्जानगर परिसरातील परिस्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.त्या पुढे म्हणाल्या,प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे एका दिवसाचे काम नाही, मात्र नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. यासाठी कालबद्ध कार्यक्रम, ठोस व दीर्घकालीन उपाययोजना आणि सविस्तर आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात संबंधित सर्व यंत्रणांचा समन्वय साधून या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, बल्लारपूर व चंद्रपूरचे तहसीलदार, सीएसटीपीएसचे सीईओ, श्रीनिवास जंगमवार, रामपाल सिंग, रोशनी खान, राजेंद्र गांधी, केमा रायपुरे, नामदेव आसुटकर, हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, मोहन आसवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे ऊर्जानगर परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नावर शासन स्तरावर गांभीर्याने पावले उचलली जात असून येत्या काळात नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



