महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय ऑनलाईन मॉक टेस्टमध्ये उल्लेखनीय सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी MHT CET (PCM, PCB) या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन मॉक टेस्टमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. ही मॉक टेस्ट टार्गेट लर्निंग वेंचर्स प्रा. लि. यांच्या वतीने घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या मॉक टेस्टमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळाला. प्रश्नपत्रिकेचा दर्जा, वेळेचे नियोजन, प्रश्न सोडविण्याची गती आणि अचूकता यांचा सराव विद्यार्थ्यांना करता आला. तसेच, ऑनलाईन परीक्षेच्या पद्धतीची सवय होऊन विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होण्यासही मदत झाली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत नियमित सरावाचे महत्त्व पटवून दिले. उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फिजिक्स विषयाचे तज्ञ मार्गदर्शक कोल्हे सर यांनी संकल्पनात्मक अभ्यासावर भर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, सुरेखा झाडे मॅडम आणि प्रशांत ताजने यांनी गणित विषयातील समस्यांचे सोपे उपाय आणि वेळेचे नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इतर सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन दिले.
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी MHT CET परीक्षेच्या दृष्टीने विनामूल्य मार्गदर्शन वर्ग, नियमित सराव सत्रे, टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक शंका निरसन सत्रांचे नियोजनबद्ध आयोजन केले जात आहे. या सर्व उपक्रमांचे संचालन मा. डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदुर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या मॉक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे मूल्यमापन करता आले असून, त्यांच्या कमतरता ओळखून त्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली आहे. आगामी MHT CET परीक्षेत उत्तम यश संपादन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी होत आहे. त्यामुळे पालकवर्गातूनही या उपक्रमांचे कौतुक होत आहे.



