ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*मनस्पर्शी दृश्यानुभव!*

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मानवी मन हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. त्यामध्ये विचार, भावना, आठवणी, निर्णयक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचे एकत्रिकरण झालेले असते. मनात दडलेल्या इच्छा, आकांक्षा आणि भिती या सर्वांचा मानवी वर्तनावर सुक्ष्म परिणाम होत असतो. बाह्य परिस्थिती, समाज आणि तंत्रज्ञानाचा देखील मनावर प्रभाव पडत असतो. आनंद, दुःख आणि राग यांसारख्या भावना मन सतत अनुभवत असते; परिणामी मन माणसाला कधी शक्तिशाली बनवते, तर कधी कमकुवतही करते.

मनाला समजून घेताना स्वतःला ओळखणे आणि त्या संवेदनांना कलाकृतीतून अभिव्यक्त करणे, हे कौशल्य सर्वसामान्यांपेक्षा चित्रकारांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. चित्रकार आपल्या मनातील भाव-भावनांना रंग, रेषा आणि विविध आकारांच्या माध्यमातून व्यक्त करीत असतो. अंतर्विचारांतून साकारलेल्या त्या कलाकृती केवळ दृश्यानुभव देत नाहीत, तर मानवी भावनांचा गाभा स्पर्शून चित्र बघणाऱ्यांशी एकरुप होतात. संवादू लागतात. भक्ती, प्रेम, राग, लोभ, दु:ख, वेदना, रितेपणा, विरह, वियोग, आशा, अपेक्षा आणि आकांक्षा अशा अवस्थांना निसर्गातील आकारांच्या साहाय्याने चित्रित करण्याची अद्वितीय क्षमता विरेंद्र चोपडे या सर्जनशील चित्रकारामध्ये आहे.

*• फ्लॉवर सेलर-* दैनंदिन जीवनातील साध्या प्रसंगांमध्येही एक अंतर्मुख, आध्यात्मिक आणि भावनिक क्षण दडलेला असतो. नेमका तोच क्षण चित्रकाराने पकडून मानवी जीवनातील सहजता, श्रद्धा आणि वास्तव यांच्यातील संबंध उलगडून दाखविण्याचा प्रयत्न ‘फ्लावर सेलर’ या चित्रातून केला आहे. चित्रात फुले विकणारी स्त्री साकारतांना, खडबड पोतमय चाफ्याच्या पानाला देवाचे रुप दिले आहे. तिची सर्व फुले विकली जावीत, याकरिता ती अवकाशातील देवरुपी पानाकडे बघून प्रार्थना करीत आहे. परंतू तिचा व्यवसाय फुले विकण्याचा असल्यामुळे तिची प्रार्थना उपजीविकेशी जोडलेली आहे. चित्रात आवश्यक घटकांची रचना करतांना खाली प्रतीकात्मक मानवाकृती आणि वर निसर्गरुपी देव असे अर्थपूर्ण संयोजन केले आहे. त्यामुळे सृष्टी आणि सृष्टीनिर्माता यांच्या नात्यातील भिन्नता अधिक स्पष्ट झाली. चित्रातील साधेपणा आणि सुबक मांडणी हा चित्राचा स्थायीभाव आहे. रंगलेपनात मॅगनिज आणि सेरुलियनसारख्या विविध निळ्या रंगछटांमुळे शांततेचा भाव प्रस्थापित झाला आहे, तर पांढऱ्या, पिवळ्या आणि गडद लाल रंगांच्या आकर्षक चाफ्याच्या फुलांनी प्रसन्नता निर्माण केली आहे. एकूणच माणसाला श्रद्धेचा आधार घेऊन जगण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्याचे निसर्गाशी असलेले नाते कलाकृतीतून अधोरेखित झाले आहे.

*• प्रेयर-* चित्रकाराने ‘प्रेयर’ या कलाकृतीत स्वतःचे प्रतीकात्मक चित्रण केले आहे. चित्रकाराच्या मनातील इच्छा पुर्ण व्हाव्या, याकरिता मानवाकृती देवाकडे प्रार्थना करतांना दाखविली आहे. अंतर्मनातून केलेली प्रार्थना शांत आणि मनाला स्पर्शणारी असते, त्यामुळे मानवी आकृतीत ओठ नाहीत. विशेषतः चित्र संयोजन करतांना आवश्यक तितक्याच घटकांचा वापर करुन, चित्रकाराच्या मनातील असंख्य इच्छा आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आकृतीच्या हातात फुले दाखविली आहेत. चित्रामध्ये वरच्या भागात देवरुपी चाफ्याचे पान आणि खालच्या भागातील ‘स्त्री’च्या आकृतीमुळे नजर आपोआपच आकृतीकडून पानाकडे आणि पुन्हा पानाकडून इतर घटकांकडे फिरत राहते. एकसंध आणि संतुलित वाटणाऱ्या या चित्रामध्ये प्रार्थनेचा भाव दर्शविण्यासाठी निळा रंग तर इच्छा आणि आकांक्षा यासाठी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांचा वापर केला आहे. अत्यंत साधी, सोपी रचना आणि मर्यादित रंगसंगती असलेली ही कलाकृती ‘मिनिमलिस्टिक’ वाटते.

*• स्टे अवे फ्रॉम फ्लॉवर-* वाढते शहरीकरण, जंगलतोड, औद्योगिकीकरण, प्रदूषण, संसाधनांचा अतिरेकी वापर आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचा समतोल धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या आशयाचा संदेश देणारी ‘स्टे अवे फ्रॉम फ्लॉवर’ ही कलाकृती अतिशय बोलकी आहे. चित्रात मध्यवर्ती रचना केलेल्या मानवाकृतीसाठी चाफ्याचे पान केवळ निसर्गाचा भाग नाही, तर आसरा, सानिध्य आणि शांततेचे प्रतीक म्हणून पुढे आले आहेत. चित्राच्या डाव्या भागात निसर्गावर आक्रमण करणारी मानवनिर्मित शक्ती ही बाणाच्या रुपात चित्रित केली असून, या बाणांपासून निसर्गातील घटकांना वाचविण्यासाठी मानवाकृतीने पानाला घट्ट कवटाळले आहे. अर्थातच “फुलांपासून दूर राहा” हा संदेश कलाकृतीतून देत असतांना, रक्षणकर्त्यांच्या दृढ उपस्थितीपुढे वाकलेल्या बाणाच्या टोकांतील मंदावलेली तीक्ष्णता लक्ष वेधून घेते. यातून निसर्गरक्षणाच्या शक्तीसमोर विध्वंसक शक्ती देखील नम्र होऊ शकतात; हे कलाकृतीच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्यात चोपडे यशस्वी झाले आहेत. मानवाकृती, पान आणि फुल यांनी चित्रातील उजव्या बाजूचा एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे, तर डाव्या भागातील बाणांनी अत्यल्प जागा घेतल्यामुळे चित्रात संतूलन राखता आले. रक्षण आणि शौर्य हा कलाकृतीचा गाभा आहे, त्यासाठी चित्रात लाल आणि तपकीरी या उष्ण रंगछटांचा प्रभावी वापर केला आहे.

*• अनटायटल्ड-* मानवी अस्तित्व, अंतर्मनाचा शोध आणि मानवाचे निसर्गाशी असलेले नाते या जीवनानुभूतींना ‘अनटायटल्ड’ या चित्रातून उलगडून दाखविले आहे. पार्श्वभूमीतील मंद चंद्रप्रकाश आणि टिमटिमणाऱ्या तारांच्या शांत वातावरणात चाफ्याच्या पानावर विसावलेली मानवाकृती फुलाशी संवाद साधतांना दिसत आहे. चित्राची रचना करतांना खालच्या भागातील मानवाकृती आणि वरच्या भागातील चंद्र आणि ताऱ्यांमुळे विरोधाभास निर्माण झाला आहे. शांतता, अंतर्मुखता आणि आध्यात्मिक गुढता व्यक्त करण्यासाठी निळ्या रंगछटा, तर नव्या जीवनाची सुरुवात आणि नैसर्गिक उर्जेसाठी हिरव्या रंगछटांचा वापर केला आहे. सपाट रंगलेपनामुळे पानावरील सुक्ष्म पोत आणि आकाशातील चांदणे एकमेकांना पुरक वाटतात. एकूणच माणसाच्या भावविश्वातील गुंतागुंत आणि आत्मपरिक्षणाची प्रक्रीया कलाकृतीमधून प्रकर्षाने जाणवते. ही कलाकृती केवळ दृष्यानुभव देत नाही, तर निसर्गाशी एकरुप होण्यासाठी मानवी अस्तित्व आणि अंतर्मनाचा शोध घेऊन शांततेकडे वाटचाल करण्याचा मौलिक संदेश देखील देते.

चोपडे हे संवेदनशील चित्रकार आहेत. त्यांची ही संवेदनशीलता त्यांच्या कृतिशील जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली आहे; आणि म्हणूनच त्या अंतःप्रेरणेतून जीवनाच्या सर्वांगाला अलगद स्पर्श करणाऱ्या सुंदर कलाकृती सातत्याने जन्माला येतात.

*• आशिष यावले*

नागपूर

मो. ९९२२२९००२२

(लेखक चित्रकलेचे अभ्यासक आहेत.)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये