ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव महीत वाईन शॉप फोडून २.४९ लाखांचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

दारूच्या ५७ बॉक्ससह DVR, बॅटरी आणि रोकड चोरी; देऊळगाव राजात खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा : तालुक्यातील ग्राम देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी एका देशी दारू दुकानासह समोरील वाईन बारवर डल्ला मारत तब्बल ₹२ लाख ४९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध अप क्रमांक १३६/२०२६, कलम ३०५, ३३४(१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद कृष्णा भगवान खंदारे (वय २६, व्यवसाय मॅनेजर, रा. गारखेड, ता. देऊळगाव राजा) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी रात्री ९.४५ ते ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० या कालावधीत ही चोरी झाली.

चोरट्यांनी दुकानातून देशी दारू ‘सखू संत्रा’ कंपनीच्या १८० एमएलच्या ४८ बाटल्यांचे ५७ बॉक्स, प्रत्येकी ₹३,२४० प्रमाणे एकूण ₹१,८४,६८० किमतीचा माल चोरून नेला. याशिवाय ९० एमएलच्या ७२ बाटल्या (₹२,८८०), जुना DVR (₹८,०००), टीव्ही स्क्रीन (₹३,०००), इन्व्हर्टर बॅटरी (₹७,०००) आणि गल्ल्यातील ₹६,३०० ची रोकड असा एकूण ₹२,११,८६० चा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याचवेळी समोरील नंदनवन वाईन बार येथूनही ₹३८,००० किमतीचा माल चोरीला गेला, त्यामुळे दोन्ही ठिकाणचा एकत्रित मुद्देमाल ₹२,४९,८६० इतका आहे. घटनेची माहिती मिळताच एमएसआय निलीमा जाधव यांनी ७ एप्रिल रोजी दुपारी २.४८ वाजता गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.चोरीची माहिती मिळताच ठाणेदार ब्रम्हा गिरी यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

गावात भीतीचे वातावरण

सलग दारू दुकान आणि समोरील वाईन बार या दोन्ही ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

एकूणच, दारूच्या बॉक्सपासून इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि रोकडपर्यंत सर्वकाही लक्ष्य करणाऱ्या या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले असून, लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये