मित्राच्या लग्नात नाचताना तरुणाचा मृत्यू; आनंदोत्सवात शोककळा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
मित्राच्या लग्नातील आनंदोत्सवात DJ च्या तालावर नाचताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अल्पेश दहागा (वय २५, रा. फुर्डी हेटी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पेश किशोर दहागावकर हे आपल्या मित्राच्या लग्न समारंभाला उपस्थित होते. लग्नाच्या कार्यक्रमात DJ च्या गजरात सर्वजण नाचत असताना अल्पेशही उत्साहाने नृत्य करत होते. मात्र, अचानक नाचता नाचता ते खाली कोसळले. सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार लक्षात आला नाही; परंतु काही वेळातच ते प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले.
घटनेनंतर तत्काळ उपस्थितांनी त्यांना गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली असून, आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. अल्पेश दहागावकर यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



