अखेर बाजार समिती ते कब्रस्तान मार्गाच्या डांबरीकरणाला प्रारंभ
कार्यकर्त्याच्या फोनवर आमदार भोंगळे यांची तात्काळ ॲक्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – शहरातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कृषी उत्पन्न बाजार समिती ते कब्रस्तान मार्ग अखेर डांबरीकरणाच्या कामासाठी मार्गस्थ झाला असून मंगळवार (दि. ७) पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
चार महिन्यांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर डांबरीकरणाचा टप्पा सतत लांबणीवर पडत होता. परिणामी, अपूर्ण अवस्थेतील या रस्त्यावरून वाहतूक करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शेतकरी, बाजार समितीतील कर्मचारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत होती. धूळ, खड्डे आणि असमतोल रस्त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली होती.
या समस्येकडे लक्ष वेधत भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते अबरार अली यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. या तक्रारीची दखल घेत आमदार भोंगळे यांनी तात्काळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामाबाबत जाब विचारला. तसेच विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत त्वरित काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
आमदारांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनानेही हालचाली वेगाने करत मंगळवारपासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा रस्ता कोरपना शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता राखून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



