पोंभुर्णा नगरात गुजरीसाठी स्वतंत्र जागा मंजूर करावी – चरणदास गुरनुले यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : शहरात सध्या गुजरी भरण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने बाजार थेट रस्त्यावर भरत आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ, आवाज आणि अपघाताचा धोका यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते चरणदास गुरनुले यांनी नगरपंचायतीकडे गुजरीसाठी कायमस्वरूपी जागा मंजूर करण्याची मागणी केली आहे.
गुजरी रस्त्यावर भरत असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वाहतुकीचा वेग मंदावतो, तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प होतो. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चरणदास गुरनुले यांनी सांगितले की, नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करू नये. शहराच्या हद्दीत योग्य नियोजन करून गुजरीसाठी स्वतंत्र जागा निश्चित केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि नागरिकांनाही दिलासा मिळेल.
दरम्यान, नागरिकांनीही प्रशासनाने लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.



