प्रादेशिक परिवहन विभागाचे बसस्थानक स्वच्छता सर्वेक्षण
प्रवासी सोयी सुविधा अद्यावत बसस्थानके होणार पुरस्कृत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर पुणे प्रदेश व प्रादेशिक अभियंता पुणे आर. कांबळे यांच्या चमूने आज दिनांक ०६ एप्रिल रोजी भद्रावती बस स्थानकास भेट देऊन स्थानिक पत्रकार दिलीप मांढरे, प्रा.विवेक सरपटवार, प्रा.लिमेश माणूसमारे , चंद्रपूर आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर वाहतूक निरीक्षक उत्कर्षा चौधरी, यांचे उपस्थितीत स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत निवारा व परिसराची पाहणी केली.
प्रश्नावली नुसार संयुक्तिक गुणानुक्रमा नुसार अव्वल बस स्थानके पुरस्कृत केली जाणार आहेत . या अनुषंगाने स्वच्छता, जल, वीज, प्रवासी निवारा, शौचालय, मूत्रीघरे , परिसर बाग, गणवेश, उपहारगृह, वाहन तळ,कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता याबाबत प्रश्नावली ला उपस्थित पत्रकारांनी दिलेल्या गुणांकानुसार मूल्यमापन पार पडले. या वेळी पत्रकारांनी भद्रावती बस स्थानकासंबंधी भेडसावणाऱ्या समस्या प्रादेशिक व्यवस्थापक यांचे लक्षात आणून देत बस स्थानक अद्यावत करण्याची सूचना केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नोंद घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे सांगितले.
याप्रसंगी कधी नव्हे ते बस स्थानक परिसर सुंदर व स्वच्छ करण्यात आला होता. खाकी गणवेश परिधान करून सर्वेक्षणाचे औचित्य पार पाडण्यास कर्मचारी सरसावले होते. फक्त सर्वेक्षणाच्या औचित्या पोटी स्वच्छता व तत्परता न दाखविता यात सातत्य असावे असे उपस्थिती प्रवाशांनी आवर्जून सांगितले.
यावेळी वाहतूक नियंत्रक शेषराव कडाम, प्रवासी मित्र मो.रफिक मो.शेख, वाहतूक नियंत्रक रुपाली ऐबट, सौ. परचाके लिपिक प्रदीप रंगारी, नीता आत्राम, आदी उपस्थित होते.



