भद्रावती बाजार समितीत हरभरा व तूर खरेदीचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती अंतर्गत उपबाजार चंदनखेडा मार्केट यार्ड येथे दि. ६ एप्रिलपासून शासनाच्या आधारभूत दराने हरभरा (चना) व तूर खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते हरभरा व तूर खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती अश्लेषा जिवतोडे (भोयर) संचालक ज्ञानेश्वर डुकरे, गजानन उताणे, कानोबा तिखट, श्यामदेव कापटे, शांताबाई रासेकर, भानुदास गायकवाड, राजू आसुटकर, सचिव नागेश पुनवटकर तसेच शासकीय आधारभूत खरेदी केंद्रप्रमुख विठ्ठल टोंगे उपस्थित होते.
शेतकरी गिरीधर सु. धांडे (धानोली), पंकज दि. विधाते (धानोली), गजानन ल. खामणकर (धानोली) व बिजोनी येथील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चना विक्रीसाठी आणला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाने हरभरा व तूर विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
तसेच खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे भद्रावती परिसरातील तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.



