ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘चेट्टी गँग’ची पुन्हा दहशत : तीन ठिकाणी मारहाण करत धुडगूस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            भद्रावती शहर व परिसरात ‘चेट्टी गँग’ने पुन्हा एकदा दहशत माजवली असून शनिवारी (दि. ४) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणी धारदार शस्त्रांच्या बळावर मारहाण करत धुडगूस घातला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिपरबोडी येथील धीरज चेट्टी, अजित चेट्टी, बंटी पाझारे, दादू यांच्यासह इतर काही साथीदारांनी प्रथम नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर जाऊन वाहनात पेट्रोल भरले. पेट्रोलचे पैसे मागितल्यावर त्यांनी कर्मचाऱ्याशी वाद घालत कर्मचारी राशी रामटेके याला मारहाण केली व तेथून पसार झाले.

यानंतर आरोपी डोलारा परिसरातील एका मांस विक्रीच्या दुकानात गेले. तेथे खरेदी करून पैसे न देता दुकानदार शेख हसन व शेख हमीद यांच्याशी वाद घालत त्यांनाही बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी तलवारीसारखी धारदार शस्त्रे काढून परिसरात दहशत निर्माण केली.

दरम्यान, रस्त्याने जात असलेल्या एका सायकलस्वारालाही आरोपींनी अडवून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेनंतर ते फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख गजानन तुपकर यांनी सांगितले की, संबंधित आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्यांच्या हालचालींच्या आधारे पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

*कठोर कारवाईची मागणी*

भद्रावती परिसरात ‘चेट्टी गँग’कडून वारंवार दादागिरी व व्यावसायिकांना धमकावण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये