ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरजू आणि वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हीच खरी जनसेवा – आ. जोरगेवार

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त सत्कार व निराधार प्रमाणपत्र वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ कन्यका परमेश्वरी सभागृहात आयोजित या कार्यक्रमामध्ये निराधार बांधव आणि भगिनींना निराधार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकहिताचा उपक्रम असून, समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हीच खरी जनसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त कन्यका परमेश्वरी सभागृह येथे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना निराधारांचा सत्कार आणि निराधार प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नामदेव डाहुले, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, नगरसेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी, आशा देशमुख, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, निलेश बेलखेडे, राकेश नाकाडे, सायली येरणे, विमल कातकर, प्रविण गिलबिले, प्रलय मशाखेत्री आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, अनेक वेळा असे दिसून येते की, माहितीच्या अभावामुळे किंवा कागदपत्रांच्या अडचणींमुळे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात. अशा वेळी शासन आणि जनतेमध्ये एक सेतू म्हणून काम करणे ही आपली जबाबदारी आहे. आज दिलेले हे निराधार प्रमाणपत्र त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरणार आहे.

भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकारण करणारी संघटना नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचा विकास साधण्याची विचारधारा असलेली पक्ष आहे. ‘अंत्योदय’चा विचार आपण प्रत्यक्षात आणत आहोत. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हेच आपले ध्येय आहे.

या प्रमाणपत्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळेल. हे केवळ कागदपत्र नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन दार उघडणारे साधन आहे.

अशा उपक्रमांद्वारे समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचा, त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करा. हाच भारतीय जनता पार्टीचा खरा संस्कार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी निराधार बांधवांचा सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबुपेठ येथे भव्य प्रक्षप्रवेश

 भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर बाबूपेठ येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात असंख्य महिला व बांधवांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून राष्ट्रसेवेचा संकल्प केला.i

   कार्यक्रमादरम्यान नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी देशसेवा आणि समाजहितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे नेतृत्व मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणादायी कार्याने प्रभावित होऊन अनेकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये