गौतम झाडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
जय किसान पुरुष बचत गटाचे सामाजिक दायित्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक हसतमुख, जिव्हाळ्याचे आणि जनतेसाठी कायम धावून जाणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका गोंडपिपरी (अनु. जाती सेल) चे तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायत चेकबोरगावचे माजी उपसरपंच गौतम झाडे (वय ५५ वर्षे) यांचे ४ एप्रिल रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. या दुःखातून सावरण्याकरिता जय किसान पुरुष बचत गटाचे सदस्य असलेल्या या गटाकडून गौतम झाडे यांच्या कुटुंबीयांना २१ हजार रुपयांची रोख स्वरूपातील आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
कालपर्यंत लोकांच्या प्रश्नांसाठी धावपळ करणारा, प्रत्येकाच्या अडचणींना स्वतःच्या समजून लढणारा माणूस कायमचा निघून गेला. वयाच्या ५५ व्या वर्षीही गौतम झाडे हे सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होते. सामान्य जनतेचे प्रश्न, अन्याय, स्थानिक समस्या यावर ते ठामपणे आवाज उठवत असत. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे समाजाप्रती असलेली तळमळ आणि लोकांविषयीचा जिव्हाळा दिसून येत होता.
गौतम झाडे यांच्या कामामुळे अनेकांना दिलासा मिळाला, अनेकांना आधार मिळाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुःखातून सावरण्याकरिता जय किसान पुरुष बचत गटाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन सामाजिक दायित्व जोपासल्या गेले. यावेळी अजय माडूरवार, अशोक रेचणकर, राजू झाडे, साईराज अलोने, राजेश डोंगरे, प्रशांत कोसणकर यांच्यासह झाडे कुटुंबातील आप्तस्वकीयांची उपस्थिती होती.



