भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक
पती-पत्नीचा मृत्यू, सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी मार्गावरील धानापूरजवळ (दि. ६ एप्रिल) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांची सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतकांची नावे गौतम सुरेश निमसरकर (वय ३५) व वैशाली गौतम निमसरकर (वय ३२), रा. अनखोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली अशी आहेत. जखमी मुलीचे नाव सिया निमसरकर (वय ६) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम निमसरकर हे पत्नी वैशाली व मुलगी सिया यांना घेऊन दुचाकीने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, धानापूरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी २३२४ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैशाली आणि सिया गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच सुरजागड चे पेट्रोलिंग अधिकारी प्रदीप येल्लुरे आणि टीम व गोंडपिपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सामान्य रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले असता गौतम पाठोपाठ वैशाली निमसरकर यांचा मृत्यू झाला. अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने सहा वर्षीय सिया एका क्षणात ती पोरकी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेने निमसरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.
*ट्रक रस्त्यावर आडवा, वाहतूक खोळंबली*
दुसऱ्या एका घटनेत कोठारी कडून सिमेंट भरून गोंडपिपरी कडे येणाऱ्या आयसर ट्रकला सुरजागड च्या कच्चा मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची गणपूर जवळील जंगलात समोरासमोर धडक झाल्याने ट्रॅक रोडवरच आडवा झाला. मात्र जीवितहानी टळली. या घटनेने अर्धा तास वाहतूक थांबली वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या या घटनेची माहिती कळताच सुरजागड पेट्रोलिंग अधिकारी प्रदीप येल्लुरे व कोठारी पोलीस घटनास्थळी येऊन ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.



