ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“आम्ही पोलीस आहोत” म्हणत बनावट कारवाई

देऊळगाव राजात ९ ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास 

चांदा ब्लास्ट

देऊळगाव राजा: : शहरात बनावट पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रकार उघडकीस आला असून, “आम्ही पोलीस आहोत” असे सांगत दोन अनोळखी इसमांनी एका शेतकऱ्याच्या हातातील ९ ग्रॅम सोन्याची अंगठी चलाखीने काढून नकली अंगठी देत पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजा येथील भगवती स्वीट मार्टसमोर घडली. याप्रकरणी काशीनाथ त्र्यंबक डोईफोडे (वय ५५, व्यवसाय शेती, रा. डोलखेडा खुर्द, ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून “आम्ही पोलीस आहोत” असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी तपासणीच्या बहाण्याने डोईफोडे यांच्या हातातील सुमारे ९ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे २७ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. काही क्षणातच आरोपींनी मूळ सोन्याच्या अंगठीऐवजी नकली अंगठी हातात देत फसवणूक केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

फसवणूक लक्षात येताच डोईफोडे यांनी तातडीने देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१९(२), २०४ आणि ३(२) नुसार गुन्हा क्रमांक १३२/२०२६ दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान गिते यांच्याकडे सोपविण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि तत्सम गुन्ह्यांच्या धाग्यांवरून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

या प्रकारामुळे देऊळगाव राजा शहरात बनावट पोलीस बनून नागरिकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये