ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेतीवाहतुकीवर महसूल पथकाची धडक कारवाई

१०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, जेसीबीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा: :तालुक्यातील नारायणखेड परिसरात अवैध रेती चोरी आणि वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल उघडकीस आणला आहे. या प्रकरणी वाहन मालकासह तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन अंढेरा येथे गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय कामात अडथळा आणत जेसीबीच्या साहाय्याने रेती पांगवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

पोलीस ठाणे अंधेरा येथे कायमी अप क्र. ०११३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ३०३(२), २३८, ३५१(२), ३(५) तसेच खाण व खनिज अधिनियम कलम २१(१), २१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर विष्णू तांबे (वय ३६), ग्राम महसूल अधिकारी, नारायणगाव, ता. देऊळगाव राजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजता माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार अवैध रेती नियंत्रण पथक नारायणखेड येथे गस्तीवर गेले होते. गावाच्या दक्षिण भागातील बळीराम उर्फ बाळू प्रकाश मुंडे यांच्या गट क्रमांक २१० मधील शेतातून येणाऱ्या रस्त्यावर एक विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे टिप्पर संशयास्पद स्थितीत येताना दिसले.

पथकाने वाहनाला थांबविल्यानंतर तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना चोरी केलेली ४ ब्रास रेती, किंमत अंदाजे २० हजार रुपये, आढळून आली. तसेच टिप्परची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याने एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल समोर आला.

दरम्यान, वाहन कोणाचे आहे अशी विचारणा केली असता ते बळीराम उर्फ बाळू मुंडे यांचे असल्याचे चालकाने सांगितले. काही वेळातच बाळू मुंडे घटनास्थळी येऊन महसूल पथकाशी हुज्जत घालू लागले. यानंतर सतीश सरोदे (रा. नागणगाव) यांचा जेसीबी बोलावून टिप्परमधील रेती हायड्रोलिक करून पांगविण्यात आली, ज्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर चालकाला टिप्पर घेऊन पळून जाण्यास सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी महसूल पथकाला “तुम्हाला पाहून घेईन” अशी धमकी देत शिवीगाळही करण्यात आली, त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये १) बळीराम उर्फ बाळू प्रकाश मुंडे, रा. नारायणखेड २) सतीश सरोदे, rा. नागणगाव ३) विना क्रमांकाच्या टिप्परचा चालक यांचा समावेश आहे.

ही धडक कारवाई उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या नियोजनातून पार पडली. पथकात मंडळ अधिकारी पी. टी. जायभाये, आर. एम. मांटे, विनोद डोईफोडे तसेच ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे आणि संजय बरांडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याची नोंद LHC जोसना सोमवंशी यांनी केली असून पुढील तपास एएसआय मारोती कायंदे करीत आहेत.

अवैध रेती माफियांविरुद्ध महसूल आणि पोलिसांचा संयुक्त बडगा अधिक कडक होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये