विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव – पदवीदान सोहळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातील पहिल्या टप्प्याचे कौतुक करून त्यांना यशाच्या शिखरावर पोहचविण्याकरीता आनंद साजरा करण्याचा अविस्मरणीय क्षण म्हणजे पदवी प्रदान सोहळा होय. अशाच उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात चांदा पब्लिक स्कूल येथील प्राथमिक विभागातील पदवी प्रदान सोहळा सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी तरूणभारत मुख्य वृत्तपत्र समन्वयक श्री. संजय रामगीरवार, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरवात केली.
सर्वप्रथम वर्ग दुसरीतील ओवी येरगुडे हिने स्वागत पर नृत्य सादर करून उपस्थितांचे व मान्यवरांचे सस्नेह स्वागत केले. शाळेची विद्यार्थीनी प्रमुख कु. दित्या पेटकर व उप-विद्यार्थीनी प्रमुख कु. जिजाऊ माने यांनी आपल्या मनागतात सर्वांगिण विकासावर भर देत, ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये कसे जोपासायचे, याचे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
वर्षभर आचार्य चाणक्य हाऊस, महर्षी वेदव्यास हाऊस, महर्षी चरक हाऊस, महर्षी पाणीनी हाऊस या हाऊसची जबाबदारी सांभाळणारे विद्यार्थी प्रतिनिधी व संघप्रमुख, उपसंघप्रमुख तर कोणत्याही कामात सदैव तत्पर असणारे अगदी निस्वार्थ निसंकोच, निरपेक्षित कार्य करणा-या स्वयंसेवकांना प्रशंसा व्यक्त करणारे प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून त्यांना गौरविण्यात आले. तर शिक्षिका सौ. प्रितीमा खोब्रागडे यांनी 2025-26 या सत्रात घेण्यात आलेले नवनवीन उपक्रम आम्ही कश्या पद्धतीने राबविले व त्यामधुन विद्यार्थी काय काय शिकले, यावर अहवाल सादर केला.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी श्री. संजय रामगीरवार यांनी पदवी ही फक्त प्रमाणपत्र नसुन ती तुमच्या ज्ञानाची, शिस्तिची आणि मेहनतीची ओळख आहे. पुढील वर्गात तुम्ही याच जिद्दीने आणि प्रामाणिकपणे वाटचाल करत रहा, यश मिळवतांना नम्रता आणि मूल्ये कायम जपा, कुठल्याही प्रकारचा ताण न घेता हसत-खेळत शिका असे वक्तव्य केले.
शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी आपल्या छोट्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, लहानग्या विद्यार्थ्यांनी आज पहिली पायरी यशस्वीरित्या पूर्ण केली. खेळता-खेळता, गाणे, गोष्टी आणि उपक्रमांच्या माध्यमातून ते खूप काही शिकले आहे. आज त्यांना पदवी देतांना आम्हाला अभिमान वाटतो आहे असे वक्तव्य करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील सत्राकरिता शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी आज तुम्ही जे छोटे पदवीधर झाले आहात ते तुमच्या आत्मविश्वासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. तुम्ही शाळेत शिकलेली प्रत्येक गोष्ट, शिस्त, प्रामाणिकपणा, मैत्री हीच तुमची खरी संपत्ती आहे असे मनोगत व्यक्त केले.
पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका, पुर्वप्राथमिक विभाग प्रमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मरणीका उपहार भेट देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका पुजा मिश्रा, अल्फा बोराम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख व कार्यक्रम प्रभारी सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


