ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्ण्यात ‘महिला सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :_ महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा पोंभुर्णा आणि महिला मंच पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय ‘महिला सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तालुक्यातील कर्तृत्ववान महिला शिक्षिकांचा त्यांच्या विशेष यशाबद्दल गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा. नमिता बांगर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सन्मानित शिक्षिकांचे अभिनंदन करत पोंभुर्णा तालुक्यातील शिक्षिकांचे कार्य जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी महिला मंचच्या राज्याध्यक्षा मा. डॉ. अल्का ठाकरे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, पुरोगामी संघटना महिलांना संघटनात्मक कार्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. सहउद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. धनराज आवारी यांनीही महिला शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला नायब तहसीलदार मा. दिपाली आत्राम, अधीक्षक सौ. चापले मॅडम तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मा. अरविंद तामगाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दोन आदर्श शिक्षिकांचा विशेष सत्कार. मा. सुलक्षणा गायकवाड (सहाय्यक शिक्षिका) यांना महाराष्ट्र शासनाचा ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच मा. मनिषा बदन (विज्ञान शिक्षिका, घाटकुळ) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची सलग दोनदा ‘राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी’साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

याशिवाय जिल्हास्तरीय कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धेत समूह नृत्य व समूह गीत स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या दिपाली तरेवार, एकता बंडावार, रेणुका धानोरे, वैशाली वडेट्टीवार, सोनाली सोरते, वैशाली ढवळे, निलिमा वानखेडे आणि मनिषा वारकर या शिक्षिकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंचच्या तालुका अध्यक्षा दिपाली तरेवार यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी महिलांच्या संघटनशक्तीवर व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे ओघवते संचालन सुलक्षणा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला मंचच्या तालुका सरचिटणीस रेणुका धानोरे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष सुधाकर कन्नाके, सुभाष मस्कावार, श्रीकांत लोनबले, संतोष गुडपल्ले, खुशाल मडावी तसेच पुरोगामी शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये