ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती नगरपंचायतीचे वॉटर एटीएम पाच वर्षांपासून बंद; लाखो रुपये पाण्यात!

नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी खाजगी विक्रेत्यांवर अवलंबून; उन्हाळ्यात गैरसोय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नगरपंचायतीने एक वॉटर एटीएम आणि तीन वॉटर कुलरची व्यवस्था केली होती. मात्र, पाच वर्षांपासून ही वॉटर एटीएम पूर्णपणे बंद असल्याने शहरवासीयांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

     नगरपंचायतीने शुद्ध पाण्याच्या सोयींसाठी शहरात लाखो रुपये खर्च केले होते. परंतु मशीन वापरात न आल्याने हे सर्व पैसे वाया गेले आहेत. आता शहरातील नागरिकांना खाजगी ठिकाणी २० लिटर पाणी २० रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. शहरातील काही जलस्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने ही व्यवस्था करण्यात आली होती.नगरपंचायतीला ही यंत्रणा एक वर्षभरही टिकवता आली नाही. बंद पडलेल्या मशीनची दुरुस्ती किंवा देखभाल करण्याकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. परिणामी, महागड्या मशीन धुळीखात पडल्या आहेत आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.नागरिकांचा आरोग्य आणि आर्थिक प्रश्न असतानाही नगरपंचायतीकडून कोणतीही जबाबदारी दाखवली जात नाही.

या मशीनची देखभाल आणि दुरुस्ती ही नगरपंचायतीची जबाबदारी असूनही याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. शुद्ध पाणी पिणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. महागडे बॉटल्ड पाणी घेणे सर्वसामान्य कुटुंबांना परवडत नाही. त्यामुळे ही वॉटर एटीएम संकल्पना राबवण्यात आली होती.सध्या एक महिन्यापासून उन्हाळ्याचा पारा वाढला आहे. शहरात कामगार, बाहेरून येणारे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना सतत पिण्याचे पाणी लागते. ऐन उन्हाळ्यात थंड आणि शुद्ध पाण्याची सोय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वॉटर कुलर आणि एटीएम दुरुस्त करून त्वरित सुरू करण्याची मागणी जिवतीकरांकडून जोरदार होत आहे.

नगरपंचायत प्रशासनाने तातडीने वॉटर एटीएम व तीनही वॉटर कुलर दुरुस्त करून सुरू करावेत, जेणेकरून नागरिकांना स्वस्त आणि शुद्ध पाणी उपलब्ध होईल.

                            – संतोष इंद्राळे, जिवती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये