गोंडपिपरीत फूड कोर्ट आणि बाजार ओट्यांसाठी २ कोटींचा निधी मंजूर
राकेश पूण यांच्या मागणीला आमदार देवराव भोंगळे यांचा पाठपुरावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थाण महाअभियान (जिल्हास्तर) वार्षिक योजना २०२५_२६ मधून नगर पंचायत गोंडपिपरी येथे फूड कोर्ट आणि बाजार ओटा बांधकामकरिता २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे गोंडपिपरी नगरातील आठवडी व दैनंदिन गुजरी बाजारातील ओट्यांचे बांधकामासोबतच फूड कोर्ट तयार करण्यात येणार असून, त्यामधून खवय्यांची भूक भागविण्यासोबतच नगर पंचायतच्या कर महसुलात वाढ होणार आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या गोंडपिपरी शहरात परिसरातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरला जातो. मात्र बाहेरगावरून आलेल्या विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे नव्हते. पावसाळ्यात तर या ठिकाणी अनेकप्रकारे त्रास सहन करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन, नगर पंचायतच्या वतीने या कामाकरीता ३० जानेवारी २०२६ च्या मासिक सभेत विषय क्रमांक ११ नुसार ठराव पारित करण्यात आला. या गंभीर विषयाची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून फूड कोर्ट आणि बाजार ओटा बांधकामकरिता २,०२,७६,०००/_ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
*बाजार विक्रेत्यांना आनंद*
गोंडपिपरी येथे आठवडी व दैनंदिन गुजरी बाजारात स्थानिक व बाहेर गावावरून किरकोळ विक्रेते येतात. मात्र त्यांना बसण्याकरिता ओटे नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. दोन कोटींच्या निधीतून लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी बाजार ओटा बांधकाम पूर्ण केल्यास, पुढे अडचणी निर्माण होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया बाजार विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
*खवय्यांचे मन तृप्त..!*
नगर पंचायतला मंजूर झालेल्या दोन कोटींच्या निधीतून खवय्यांकरिता फूड कोर्ट बांधण्यात येणार असून, या ठिकाणी विविध प्रकारच्या खाद्याची दुकाने राहणार आहेत. ज्यामुळे शहरासोबतच बाहेर गावावरून येणाऱ्या खवय्यांचे मन तृप्त होणार आहे.
*गोंडपिपरीच्या विकासाला नवी चालना_ राकेश पूण*
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुका व नगराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनेमधून अनेक प्रकारची विकासकामे मंजूर केली जात आहेत. गोंडपिपरी नगरातील फूड कोर्ट आणि बाजार ओटा बांधकामकरिता दोन कोटी रुपयांच्या विकासनिधीने शहरात नवी बाजारपेठ निर्माण होईल, असे मत भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक राकेश पूण यांनी सांगितले.



