परमानंद तिराणिक राज्यस्तरीय आयकॉन आदर्श पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आनंद अंध विद्यालय आनंदवन येथील कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच संविधानाची पोस्ट कार्डद्वारे शाळा, महाविद्यालय व ग्रामस्तरावर मागासलेल्या आदिवासी डोंगराळ भागात जाऊन संविधानाचा जागर करून वारली चित्रकला व आदिवासी गोंडी चित्रकलेची अस्मिता कायम राहावी ही कला शालेय शिक्षणाचा एक भाग म्हणून आदिवासी दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांची राज्यस्तरावर दखल घेऊन ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने दिला जाणारा 2025 -26 या वर्षाचा मानाचा’ एज्युकेशन आयकॉन’ समिट 2026 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्या हस्ते पुण्यात परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षण तज्ञांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचा उभे राहून सन्मान केला. यासोबतच भारतातून विविध राज्यातून झालेल्या शिक्षकांचा व शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एकूण 32 लक्ष एवढे रोख राशीचा धनादेश देऊन त्यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
ग दि माडगूळकर नाट्यगृहात आयोजित एज्युकेशन आयकॉन समिट २०२६ या भव्य दिव्य सोहळ्यात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात दत्तात्रय वारे गुरुजी, केशव गावित गुरुजी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी शुभम पवार, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर,शिक्षण सभापती नानासाहेब शिवले, ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक सुदाम शेडगे, अर्चना शेडगे ,सोनाली गाडे, ध्येय परिवाराचे निमंत्रक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.



