कोरपना कधी होणार संपूर्ण सुविधायुक्त तालुका
प्रशासनाने द्यावे लक्ष ; ११३ गावातील नागरिकांना अडचण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ तालुक्याची निर्मिती होऊन तीन दशकाहून अधिकचा कालावधी लोटला. मात्र आजही तालुक्यात प्रशासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, आरोग्य व अन्य सुविधांची कमतरता जाणवते आहे. महसूल, कृषी, वन, मृदा व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचे सिंचाई, लघु सिंचाई, पाटबंधारे, बीएसएनएल विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, हत्तीरोग निर्मूलन पथक, निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क, निरीक्षक वजन व मापे विभाग, बस आगार, विधानसभा क्षेत्र, भूविकास बँक, जिल्हा बँकेचे विभागीय कार्यालय, लेखापरीक्षक संस्था, होमगार्ड उपपथक, सीटीसी (कुपोषण निर्मूलन) सेंटर, शासकीय टेक्निकल इन्स्टिट्यूट, अभिलेखागार मधील जुने रेकॉर्ड (तहसील कार्यालय), कला- वाणिज्य -विज्ञान विद्या शाखेचे पदव्युत्तर महाविद्यालय, उर्दू -तेलगू विद्याशाखेचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कमर्शियल बँक आदी सुविधा व संबंधित कामासाठी तालुका विभाजनानंतरही राजुराचीच पायपीट करावी लागते आहे. यातील काही सुविधांचे विभाजन करून कोरपना तालुक्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिवाय महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तालुका पशुधन अधिकारी कार्यालय, कर्मचारी विमा निगम कार्यालय, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग आदी गडचांदूर ला, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदा तर वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय वनसडी येथे स्थित आहे. ही सर्व कार्यालये कोरपना या तालुका स्थानि स्थलांतरित करून नागरिकांची होणारी परवड थांबवावी.जेणेकरून तालुक्यातील नागरिकांना सर्व कामे एकाच ठिकाणी कमी वेळेत व जलद गतीने करता येईल. या दृष्टीने लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
तालुका मुख्यालयी या बाबींचा अभाव
बस स्थानक, राष्ट्रीयकृत बँक, अधिकृत गॅस एजन्सी, बीज गुणन परीक्षण केंद्र, बालसुधार गृह ,टिंबर मार्ट, ओबीसी, एस सी मुला मुलींचे वस्तीगृह, शासकीय रोपवाटिका , विज्ञान वाणिज्य विद्या शाखेचे पदवी पदव्युत्तर महाविद्यालय, कला विद्या शाखेचे पदव्युत्तर महाविद्यालय, आयटीआय मध्ये कोपा व अन्य अभ्यासक्रम, कृषी, फार्मसी, अभियांत्रिकी, वन, शारीरिक, चित्रकला, डीएड बीएड विद्य शाखेचे महाविद्यालय, विविध स्पर्धा परीक्षेचे केंद्र, पदवीधर मतदान केंद्र, आरटीओ शिबिर केंद्र, एसटी मोफत पास सुविधा केंद्र, नाफेडचे तूर सोयाबीन हरभरा खरेदी केंद्र, पाणी प्रयोगशाळा, उपजिल्हा रुग्णालय, तज्ञ डॉक्टर,एम आय डी सी. कापूस संशोधन केंद्र, गुजरी बाजार, कमर्शियल बँका, नामांकित पतसंस्था, सीडीएम बँकिंग सेवा, वखार महामंडळ गोडाऊन, तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभाग व पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात पशुधन विस्तार पदस्थापना होणे अत्यंत गरजेची आहे. परंतु याकडे ही दुर्लक्ष होत आहे.
अनेक इमारती अडगळीत तर काहीना इमारती नाही
कोरपना येथे दूरभाष केंद्र, पंचायत समिती, तहसील, एम एस ई बी, पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचारी सदनिका, दूरभाष केंद्र, मायक्रोफोन कार्यालय, नव्याने बांधण्यात आलेली तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय , पंचायत समितीतील प्रशिक्षण केंद्र इमारत वापरा विना अडगळीत पडून आहे. तर आदिवासी मुला मुलीचे वस्तीगृह, पोस्ट ऑफिस, उपविभागीय डाक निरीक्षक कार्यालय, आपला दवाखाना किरायाचे इमारतीत सुरू आहे. तर मंडळ अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नगर पंचायत, एकात्मिक बालविकास सेवा योजना, जिल्हा परिषद बांधकाम व पाणीपुरवठा उपविभाग अन्य विभागाच्या इमारतीत अपुऱ्या जागेत सुरू आहे.या विभागांना हक्काच्या इमारतीची गरज आहे. ग्रामीण रुग्णालय , भूमी अभिलेख कार्यालय इमारतीला विस्तारीकरणाची गरज आहे.



