जागतिक परिस्थितीचा परिणाम
सेलूमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सुरू असलेल्या जागतिक घडामोडींचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला असून, सेलू येथील जवादे गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांकडून आगाऊ नोंदणी (नंबर) करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नाही. अनेक ग्राहकांना २ ते ३ दिवस प्रतीक्षा करावी लागत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
विशेषतः घरगुती वापरासाठी गॅस अत्यावश्यक असल्याने महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडर मिळण्यात होणारा विलंब यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, ग्राहकांमध्ये मानसिक तणाव आणि रोष स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.


