भाजप नगरसेवकांची एकमुखी मागणी
चंद्रशेखर शेट्टी यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करावी

चांदा ब्लास्ट
महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवक व नगरसेविकांनी मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याची एकमुखी मागणी केली आहे. या बाबतचे निवेदनही त्यांच्या वतीने आज शुक्रवारी महापौर संगिता खांडेकर यांना दिले आहे.
यावेळी मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, माजी महानगर अध्यक्ष तथा नगर सेवक सुभाष कासनगोटूटवार, महामंत्री रवींद्र गुरनुले, नगरसेवक संजय कंचर्लावार, भालचंद्र दानव, जितेश कुलमेथे, रॉबिन बिस्वास, नितेश गवळी, नगरसेविका शितल गुरनुले, अॅड. सारिका संदुरकर, पुष्पा उराडे, आशा देशमुख, अनुजा तायडे, डिलन केळझरकर, राजलक्ष्मी कारंगल, ज्योती जीवने, सरला कुलसंगे आदिंची उपस्थिती होती.
महानगरपालिकेत चंद्रशेखर शेट्टी हे गटनेता म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा गटनेताच सभागृह नेता म्हणून कार्य करत असल्याची परंपरा आहे. या अनुषंगाने, त्यांच्या नेतृत्वावर सर्व नगरसेवकांचा पूर्ण विश्वास असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिकेतील कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी चंद्रशेखर शेट्टी यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी सदर निवेदनात म्हटले आहे.
तसेच, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष नगरसेवक यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, भाजप गटनेता जे नाव निश्चित करतील त्यास त्यांच्या गटाचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने, गटनेता चंद्रशेखर शेट्टी यांनाच सभागृह नेतेपदी नियुक्ती देण्यात यावी, अशी सर्व नगरसेवकांची एकमुखी मागणी आहे.



