रामनवमी निमित्त बल्लारपूरमध्ये उसळला अध्यात्मिक ऊर्जेचा जनसागर
प. पू. सद्गुरु दादाश्री यांच्या दिव्य सानिध्यात सूक्ष्म ध्यान साधना, भक्तिमय भजन व महासत्संगाने भाविक मंत्रमुग्ध

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर :_ रामनवमीच्या पावन आणि मंगलमय पर्वानिमित्त दिनांक २६ मार्च २०२६ रोजी गुरुवारी श्री तिरुपती बालाजी सभागृह, बल्लारपूर येथे मुक्तेश्वरी गुरुपीठाचे प. पू. सद्गुरु दादाश्री यांच्या परम पावन सानिध्यात आयोजित सूक्ष्म ध्यान साधना, भक्तिमय भजन आणि भव्य महासत्संग कार्यक्रम अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला.
या दिव्य सोहळ्यासाठी बल्लारपूर शहरासह परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवत आध्यात्मिक साधनेचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या रामभक्तीने ओतप्रोत भजनांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भावपूर्ण भजनांच्या सुरावटींमुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक आणि प्रसन्न झाले होते.
मंत्रोच्चार, ध्यान साधना आणि सामूहिक भजनामुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली. अनेक भाविकांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत रामनामाच्या गजरात स्वतःला समर्पित केले.
सद्गुरु दादाश्री यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून शांत मन, सकारात्मक विचारसरणी आणि अध्यात्मिक जीवनशैली हीच खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली असल्याचा संदेश दिला. सूक्ष्म ध्यान साधनेदरम्यान उपस्थितांना अंतर्मनातील शांतता, समाधान आणि आत्मिक आनंदाचा अनोखा अनुभव मिळाला.
रामनवमीच्या पवित्र दिवशी पार पडलेला हा महासत्संग बल्लारपूर शहरासाठी एक संस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरला असून कार्यक्रमाने भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि नवचैतन्य निर्माण केले.



