निविदा न काढताच पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात
प्रशासनाचे दुर्लक्ष की ठेकेदाराची मनमानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोजोली मक्ता ग्रामपंचायतमध्ये बळीराजा पाणंद रस्ते कामाकरीता निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला सुरुवात केली असून प्रशासनाचे याकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने, शासकीय प्रक्रियेलाच तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेतरस्ते मजबूत करण्यासाठी मुरूम टाकून पांदण रस्ते तयार केले जात आहेत. मातोश्री योजनेच्या धर्तीवर आता यंत्रांचा वापर करून जलद कामासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ देखील राज्यभरात राबवली जात आहे. या योजनेमुळे पावसाळ्यात चिखलामुळे होणारा शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार असून, शेती कामात गती येणार आहे. याच योजनेतून गोंडपिंपरी तालुक्यात एकूण ४२ कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे करण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र गोजोली ग्रामपंचायतने निविदा प्रक्रिया न राबवता कामाला सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत गोजोली मक्ता येथे मुख्य रस्त्यापासून ते बाबुराव शेडमाके यांच्या शेतापर्यंत एक किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम मंजूर झाले. या कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताही प्राप्त झाली. यानंतर मुख्य कामाला सुरुवात करण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पार पाडून, कमी दराची निविदा मंजूर करूनच काम सुरु करणे आवश्यक होते. मात्र असे काहीही न करता पांदण रस्त्याचे काम सुरू केले असल्याने शासकीय नियमावलीलाच धाब्यावर बसविल्याचे दिसून येत आहे. अशा या गंभीर विषयावर प्रशासनाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
*या कामाविषयी माहीत नाही*
गोजोली येथील पांदण रस्त्याचे काम ग्रामपंचायतचे कार्यालयाच्या बाजूला करण्यात आले. यासाठी जे. सी. बी. मशीन ही ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ठेवण्यात येत होती. हे काम जवळपास एक आठवडा सुरू राहिले. एक किलोमीटर पैकी जवळपास ५०० मीटर रस्त्यावर चर खोदून मातीकाम करण्यात आले. मात्र या कामाबाबत ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी यांना विचारणा केली असता, काम सुरू असल्याबाबत आम्हाला कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले.
*अनेक ठिकाणी कामाला सुरुवात*
तालुक्यात ४२ पांदण रस्त्याचे कामाला मंजुरी मिळाली. यातील काही कामे ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरु करण्यात आली तर बहुसंख्य कामांच्या निविदा प्रक्रिया पार पडली नाही. तरीपण निविदा प्रक्रिया पार न पडताच अनेक ग्रामपंचायतींनी काम सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संगनमताने पांदण रस्त्याची कामे वाटून घेतल्याचे समजते. यावर प्रशासन कोणती पाऊले उचलणार, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे



