मेहुणाराजाचा वीरपुत्र अंकुश मिसाळ जम्मू-काश्मीरमध्ये शहीद : तालुक्यावर शोककळा
मातृभूमीसाठी प्राणार्पण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मेहुणाराजातील शहीद जवान अंकुश मिसाळ यांना २९ जूनला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला
संत चोखामेळा यांच्या जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहुणाराजा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले गावचे वीरपुत्र अंकुश महादेव मिसाळ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावत असताना २६ जून २०२६ रोजी वीरमरण पत्करले. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे संपूर्ण गावासह देऊळगाव राजा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
देशाच्या सीमांचे रक्षण करताना शहीद झालेल्या अंकुश मिसाळ यांच्या वीरमरणाची बातमी समजताच मेहुणाराजा आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. एका बाजूला शोक, तर दुसऱ्या बाजूला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाबद्दल अभिमानाची भावना नागरिकांच्या मनात दाटून आली.
शहीद जवान अंकुश मिसाळ यांच्यावर २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मेहुणाराजा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि माजी सैनिक उपस्थित होते,संपूर्ण परिसरातून शहीद वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते
अंकुश मिसाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा रणवीर आणि मुलगी दिव्या असा परिवार आहे. त्यांचे वडील यांचे पूर्वीच निधन झाले असून दोन बहिणी आहेत. मुलगी दिव्या इयत्ता सहावीत, तर मुलगा रणवीर इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. आनंदी आणि सुसंस्कृत कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
शहीद अंकुश मिसाळ यांच्या बलिदानाने संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्याला अभिमानाची भावना दिली असून, मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान कायम स्मरणात राहील. मेहुणाराजा गावातील हा वीरपुत्र देशसेवेच्या इतिहासात आपल्या शौर्याने अमर झाला आहे.



