हॉटेलमध्ये जातिवाचक शिवीगाळ व मारहाणीचा आरोप
ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजात हॉटेल मालकाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा; जातीवाचक अपमान व मारहाणीची तक्रार
देऊळगाव राजा शहरातील दुर्गापुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप दशरथ ससाणे (वय ४२, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून लक्ष्मण कोल्हे (वय ५०, रा. देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २९५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता फिर्यादी जेवण्यासाठी आरोपीच्या हॉटेलमध्ये गेले असता आरोपीने त्यांना कथितपणे जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरून शिवीगाळ केली. फिर्यादीने विरोध केल्यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या खांद्याला आणि मनगटाला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या लेखी तक्रारी व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), २९६, ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस कर्मचारी जाधव यांनी केली असून, प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे करीत आहेत.



