अफवांना बळी पडू नका ; पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत : प्रशासनाचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
इराण–इस्त्राईल–अमेरिका या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध अफवांना उधाण आले असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. भद्रावती शहरात पेट्रोल व डिझेल टंचाईची अफवा पसरल्यामुळे पेट्रोल पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश भांडारकर यांनी तहसील कार्यालयात सर्व पेट्रोल पंप चालकांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत करण्यात आलेल्या आढाव्यानुसार पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे सर्व संचालकांनी स्पष्ट केले. तसेच गॅस सिलेंडरचा पुरवठाही नियमितपणे होत असल्याची माहिती देण्यात आली.
तरीही २३ मार्चच्या सायंकाळपासून अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे दिसून आले. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष वेधत नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
*तालुका पुरवठा अधिकारी हर्षा दुधे यांनी सांगितले की, “सर्व पेट्रोल पंपांवर पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे करावेत.”*
*सरस्वती पेट्रोल पंपचे संचालक प्रशांत शिंदे यांनीही स्पष्ट केले की, “कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा नियमित होत असून त्याचे वितरणही सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये.”*
प्रशासनाचे आवाहन :
अफवांपासून सावध रहा, संयम बाळगा आणि गरजेनुसारच इंधन भरा — घाबरून साठा करण्याची आवश्यकता नाही.



