राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीचा तृतीय क्रमांक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ इंडिअन सोसायटी फॉर टेक्निकल एजुकेशन स्थानिक शाखा आणि शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथील संगणक तंत्रज्ञान शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी राहील प्रदीप खापर्डे, आदित्य राजकुमार मेश्राम, दानिश शब्बीर शेख, अयान अहमद अली लाखानी, प्रज्वल कैलास शामकुळे, प्रतीक शरद नागपुरे यांनी उज्ज्वल यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे. दि. १७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांचे मूल्यमापन नाविन्यता, सामाजिक उपयोगिता, अंमलबजावणीची क्षमता तसेच तांत्रिक गुणवत्ता या निकषांवर करण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाने आपल्या अभिनव संकल्पना, प्रभावी सादरीकरण आणि उपयुक्ततेच्या जोरावर परीक्षकांची विशेष दाद मिळवली. या प्रकल्पामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि तांत्रिक कौशल्य अधोरेखित झाले आहे.
या यशामागे विभागप्रमुख तथा प्रकल्प मार्गदर्शक शालिनी खरकाटे तसेच प्राध्यापक डॉ. केमल कोचे आणि प्रा. मीनल मून यांचे मार्गदर्शन लाभले असून प्र. प्राचार्य डॉ. राजन वानखडे व सर्व विभागप्रमुख, अधिव्याख्याता व कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



